नवी दिल्ली : जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातून राजधानी दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे बुधवारी सकाळी जयपूर विमानतळावर अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे अपहरण झाल्याचा सुरक्षा इशारा नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. विमानातील पायलटने काही सेकंदांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हायजॅकसाठी वापरला जाणारा अतिशय संवेदनशील -७५०० हा आपत्कालीन कोड प्रसारित केला होता. हा अलर्ट मिळताच विमान तातडीने जयपूरकडे वळवण्यात आले. जयपूर विमानतळावर सकाळी सुमारे ९:४५ वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग करून त्याला तत्काळ इतर विमानांपासून वेगळे ठेवत आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स नाऊ, दैनिक भास्करने दिले आहे.
अहमदाबाद एटीसीला मिळाला -७५०० कोड
नागरी विमान वाहतूक क्षेत्रात -७५०० हा कोड केवळ विमान अपहरण किंवा अनधिकृत कब्जा झाल्याच्या अत्यंत गंभीर प्रसंगीच वापरला जातो. प्राथमिक माहितीनुसार, अहमदाबाद एटीसीला काही सेकंदांसाठी विमानातून हा अलर्ट मिळाला. हा कोड पायलटच्या हातून नजरचुकीने दाबला गेला की खरोखर काही संशयास्पद घडले होते, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.
जयपूरमध्ये हाय अलर्ट; आयसोलेशन बेमध्ये कसून तपासणी
विमान जयपूरमध्ये उतरताच सर्व सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला सुरक्षित अंतरावर असलेल्या आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. सीआयएसएफ, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी विमानाची, प्रवाशांची आणि सामानाची कसून तपासणी करत आहेत. प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा घटना अधिकृतपणे समोर आलेली नाही.
नेमके काय घडले होते?
फ्लाइटरडार२४च्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या एआय-२०३० या विमानाने मंगळवारी संध्याकाळी सुमारे ७:३० वाजता फ्रँकफर्टहून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. ठरलेल्या वेळापत्रकानुसार हे विमान बुधवारी पहाटे ४:१५ वाजता दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, सुरक्षा अलर्ट आणि तांत्रिक घडामोडींमुळे विमानाचा मार्ग बदलून ते सुरक्षितपणे जयपूरमध्ये उतरवण्यात आले.